सीएसएमटी परिसरातही गर्दी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलकांनी लाखोंच्या संख्येने मुंबईत प्रवेश केल्याने शहरातील मुख्य रस्ते अडकून पडले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर, आझाद मैदान परिसरात, सीएसएमटीच्या स्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने आंदोलक उभे होते. तसेच, छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आंदोलक बसले होते. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच सीएसएमटीवरून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आले.
मुंबईतील सीएसएमटी स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, दादर स्टेशन, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी यासारख्या प्रमुख ठिकाणी भगव्या टोप्या घातलेले मराठा आंदोलक सर्वत्र दिसत आहेत. सीएसएमटीमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर जमले. यावेळी मोठी गर्दी सीएसएमटी परिसर झाली होती. त्यामुळे गर्दीला संयमाने बाजूला करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात पोलिसांनी गांधीगिरी करत आंदोलकांना मनोज जरांगे यांचा व्हिडिओ दाखवत बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
तसेच, सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. काही आंदोलक रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले होते, तर काही चक्क झोपले होते. एरवी कोणी प्रवासी जास्त वेळ बसल्यास त्याची पोलीस विचारपूस करतात. तसेच, त्याला लवकरात लवकर तेथून जाण्यास सांगतात. आझाद मैदानात जाणाऱ्या आंदोलकांना जादा वेळ स्थानकात थांबू दिले जात नाही. परंतु, मराठा आंदोलक मात्र गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी दुपारपर्यंत स्थानकातच होते.
सीएसएमटी स्थानकात होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांना आवश्यक आणि अपरिहार्य असेल तरच सीएसएमटी स्थानकातून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केले आहे.







