। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे शहराला वाहतूक कोंडीचे ग्रहण काही सुटत नसल्याने येथील नागरी मात्र त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होऊन रस्ते मोठे झाले असलेतरी रस्त्यांवर व्यापार्यांचे अतिक्रमण, फेरीवाल्यांनी रस्त्यातच मांडलेली दुकाने, रस्त्यातील हातागाडयांचा उच्छाद व रस्त्यातच पार्किंग केलेली वाहने यामुळे येथील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी व वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही नगरपालिका प्रशासन यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
शहरात सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वैष्णवी हॉटेल, कामगार वसाहत व राजपाल नाका या ठिकाणी होत आहे. यावेळी रस्त्यावर वेडीवाकडी उभी राहणारी वाहने, रिक्षांची नाक्यांनाक्यावर गर्दी व हातगाडी,फेरीवाल्यांचे बस्तान आदी कारणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. नगरपालिका प्रशासन वाहतूक पोलिसांवर ढकलत हे काम त्यांचे असल्याचे सांगते. वाहतूक पोलीस नगरपालिका प्रशासनानेही यामध्ये जातीने लक्ष घालत नसल्याची खंत व्यक्त केली. तरी दोन्ही विभागाने यात लक्ष घालून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नगरपालिकेची स्वतःची पार्किंगची सोय नाही. त्यामुळेच वाहने कुठे उभी करावयाची असा सवाल वाहनचालक करीत आहेत. यासाठी नगरपालिकेने प्रथम वाहन पार्किंगची सोय करावी. त्यानंतरच काहीअंशी तरी वाहतूक कोंडी कमी होईल असे बोलले जात आहे. त्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरातील वाहतूक कोंडीची समस्यां सुटणे कठीण दिसते.