। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी 5 ऑगस्टला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, फेरीवाले, हॉटेल व्यावसायिकांनी लावलेले फलक हटविण्याची कारवाई अलिबाग पोलीस आणि नगरपरिषद याच्या संयुक्त विद्यमाने सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारी 3 जुलैला अलिबाग पोलीस ठाण्यात शहरातील अनधिकृत पार्किंग, फेरीवाले यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी मिटविण्यासाठी पोलीस, नगरपरिषद आणि पत्रकार यांची बैठक संपन्न झाली होती. त्यानुसार शुक्रवारी पोलीस, नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
अलिबाग शहरातील रस्ते रुंद झाले तरी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावलेली वाहने, फेरीवाले, फलक यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही बाधा निर्माण होत आहे. शहरात येणारे पर्यटक, स्थानिकांच्या वाहनाची संख्या जास्त असल्याने वाहतूक समस्या नेहमीचीच झाली होती. रस्त्याच्या कडेला फेरीवाले याच्या गाड्या, हॉटेल समोर बेशिस्तपणे लावलेली वाहने, वाहन चालकांची बेशिस्तपणा यामुळे वाहतूक कोंडी होत होती. शहरातील एकही रस्ता हा मोकळा राहिलेला नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी नागरिकांनाही शिस्त लावणे गरजेचे आहे.