| रसायनी | वार्ताहर |
सध्या चौक-कर्जत रस्त्यावर रात्रीची वाहतूक कोंडी होत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत असून, या रस्त्याला वाहतूक कोंडींचे ग्रहण लागल्याचे दिसून येते.
चौक-कर्जत रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे, त्यामुळे कधी एक बाजू रस्त्याची खोदली जाते, तर दुसरी बाजू बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. खोदलेल्या बाजूला कोणतीच सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा रस्ता दुपदरी आहे की तीन काहीही समजण्यास मार्ग नाही. चौक ते कर्जत रस्त्यादरम्यान कुठेही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, तिथेही गाडीला सिग्नल देण्यास कुणीही नसल्याने दोन्ही बाजूचे चालक पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्टी नाही, त्यामुळे वाहनांची गर्दी वाढत गेली आहे.
एक-एक किमीच्या रांगा दोन्ही बाजूला असतात, कुणीही सौजन्य दाखवत नाही, त्यातच दुचाकी आणि रिक्षा, इको हे मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असतात आणि वाहतूक कोंडीत भर पडते. चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे व त्यांचे सहकारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. पण, हे वारंवार शक्य होत नाही. रस्ता बांधकाम ठेकेदार अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.