सहा ते सात किमीपर्यंत लांबच-लांब रांगा
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. आज रविवार असल्याने तसेच कोकणात जाणाऱ्या वाहनाची संख्याही वाढल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी हजाराच्या आसपास एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यातील काही बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या बसेसची गर्दीही या महामार्गावर झाली आहे.
मात्र, ज्यांना एसटी बसचे आणि रेल्वेचे तिकीट मिळाले नाही, असे गणेशभक्त स्वतः गाडी करून जात आहेत. कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील माणगाव, लोणारेजवळील परिसरात सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोलमाफी दिली आहे. गणेश भक्तांनी शुक्रवार रात्रीपासूनच कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. लोणेरे येथे उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सर्विस रोडच्या अरुंद रस्त्यावरून सुरू आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून अचानक वाहनांची संख्या वाढल्यामुळे आज पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
महामार्गावर 600 हून अधिक पोलीस तैनात
दरम्यान, प्रशासनाने गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 600 हून अधिक पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी तैनात केले आहेत. तसेच या महामार्गावर मोटर सायकल पेट्रोलिंगही होताना दिसत आहे.






