वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांकडून मनस्ताप
| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर शिमगा उत्सवाच्या धर्तीवर कोकणात जाणार्या वाहनांची बुधवारी (दि.12) रात्रीपासूनच वर्दळ वाढली होती. मात्र, महामार्गावरील वाहनांची संख्या अधिकच वाढल्याने गुरुवारी पहाटेपासूनच वडखळपासून पुढे आमटेम ते नागोठणे फाटा तसेच कोलाड ते इंदापूर बायपास, माणगाव ते लोणेरेदरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, होळीसाठी गावी जाणार्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे कोकणच्या दिशेने जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.
कोकणातील महत्त्वाच्या होळी उत्सवाच्या निमित्ताने मुंबई शहर व उपनगरातून तसेच ठाणे, कल्याण या ठिकाणाहून चाकरमान्यांनी गावचा रस्ता धरला. त्यामुळे महामार्गावर एकच वाहनांची संख्या वाढली. परिणामी, वाहतूक कोंडी वाढली. वडखळ ते कोलाड, इंदापूर बायपास, माणगाव बाजारपेठ ते लोणेरे हायवे नाका इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोलाड ते महाड या तासाभराच्या प्रवासाला अडीच ते तीन तास लागत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे मुंबईकडे जाणार्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून बाहेर पडून मुंबईला लवकर पोहोचण्याची घाई झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने चालवली जात आहेत. परिणामी, ही वाहतूक कोंडी झाली असून, महामार्ग वाहतूक पोलीस ऐनघर व महाड येथील वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही कोंडी सोडवायला पोलीस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते, त्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांची दमछाक होत असल्याचेही यावेळी दिसून आले.
होळी उत्सव तसेच सलगच्या लागलेल्या सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. वडखळ ते कोलाडदरम्यान आमटेम ते नागोठणे फाटा तसेच कोलाड ते इंदापूर बायपास याठिकाणी वाहतूक कोंडी झाली. यावेळी कोकणात होळी उत्सवासाठी जाणार्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी महामार्गावर वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी उपस्थित आहेत.
गीतांजली जगताप,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा
नियोजनशून्य कामाचा फटका
महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर यादरम्यान सुरु असलेल्या पहिल्या टप्प्यातील नियोजनशून्य अर्धवट कामामुळे सण- उत्सवात वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीचा फटका बसतो. त्यामुळे महामार्गावरील अर्धवट कामांचे योग्य नियोजन करून ती मार्गी लावावीत. महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लावावेत अशी मागणी सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे संबंधित महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार या विषयांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित करून चौपदरीकरणाचे काम मार्गी लावतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.