सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
| पाताळगंगा | वार्ताहर |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुण्याकडे जाणार्या मार्गांवर मोठी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. तर, सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेरगावी निघाले असता ही वाहतूक कोंडी झाली असून, त्यातच अनेक ठिकाणच्या शाळांना सुट्ट्या पडल्याने या वाहतूक कोंडीने अनेकांना डोकेदुखी झाली असता ही वाहतूक कोंडी सात ते आठ किलोमीटरपर्यंत झाल्याचे पाहायला मिळाले.
सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक, पर्यटनस्थळांवर जाण्यास निघाल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर पहाटेपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. खंडाळा घाट परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे.
शुक्रवारी गुड फ्रायडे च्या सुट्टीला जोडूनच शनिवार व रविवार आल्याने या सलग तीन दिवस सुट्ट्यांच्या निमित्त पर्यटन स्थळांवर जाण्याचा चंग बांधत मोठ्या प्रमाणात पर्यटक खासगी वाहनांमधून घराबाहेर पडले आहेत. वाहतूक कोंडीपासून सुटका मिळावी याकरिता पहाटेच पर्यटक घराबाहेर पडले. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांना खंडाळा ते खोपोलीदरम्यान वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागले आहे. खंडाळा ते खोपोलीदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.







