। पाली/बेणसे । वार्ताहर ।
उन्हाळ्याच्या दिवसात सागर किनारे व पर्यटन स्थले बहरली आहेत. मौजमस्ती व फिरन्यासाठी पर्यटक, नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागलेत. अशातच शुक्रवार, शनिवार रविवार व सोमवार सलग सुट्ट्या मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबई ,पुणे व इतर शहर उपनगरातून सुट्टीसाठी आलेल्या पर्यटक, चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. शुक्रवारी व शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत पेण वडखळ, वाकण, माणगाव याठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आली. तीन ते चार किमी वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशी त्रस्त झाले. शिवाय रुग्णवाहिका देखील वाहतूक कोंडीत सापडल्याने रुग्णांचे हाल झाल्याचे दिसून आले. उन्हाचा तडाखा त्यात धुळीचे साम्राज्य यामुळे प्रवाशी बेजार झाल्याचे दिसून आले. महामार्ग चौपदरी करणाचा एक टप्पा पूर्ण झाला असला तरी वाहतूक कोंडी पिच्छा सोडत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी खूप वाढली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व पाली खोपोली राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. पनवेल ते पेण रस्ता चकाचक झाल्याने येथील वर्दळ वाढली आहे. अलिबाग, मुरुड, जंजिरा, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, आदी ठिकाणी जगभरातील पर्यटक सागरी किनार्यावर मौजमस्तीसाठी येत असतात. सध्या सुट्ट्या असल्याने पर्यटन स्थळे हाऊसफुल झाली आहेत, शिवाय मुख्य महामार्ग देखील कोंडीत सापडले आहेत. पाली, माणगाव, इंदापूर, कोलाड, पेण व वडखळ बायपास आदी ठिकाणी वाहतूक कोंडी असते. त्यातच मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने तर वाहतुकीवर आणखीणच परिणाम होतो.
वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन
बेशिस्त वाहनचालक, अवजड वाहने, लेन सोडून पुढे जाणारी वाहने तसेच महामार्गाचे सुरु असलेले काम यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीस महामार्गावर ठिकठिकाणी तैनात आहेत. तसेच नाक्यांवर पोलीस चौक्या उभारल्या आहेत. परंतू महामार्गावरील वाहतुकीचा भार बघता पोलीसांवर वाहतुक कोंडी सोडवितांना ताण येत आहे.







