जेएनपीटी परिसरात वाहतूक कोंडी; वाहनचालक, प्रवाशांचे हाल

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यासह नवीमुंबई, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. नवी मुंबई ते ठाणे तसेच मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड रहदारी, ट्रॅफिक असते. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दिवसा सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे.त्यामुळे जेएनपीटी बंदर परिसर,उरण,पनवेल आणि नवीमुंबई महामार्गांच्या बाजूला अवजड वाहने उभी करण्यात आली.त्यामुळे जेएनपीटी बंदराच्या परिसरात वाहनांची लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर जड वाहने नवीमुंबई हद्दीतून ठाणे जिल्ह्यातील हद्दीत प्रवेश करून गुजरात तसेच नाशिक जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याने ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन सदर वाहतूक कोंडीचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .सदर वाहतूक कोंडी समस्या संदर्भात नागरिकांचे शासन दरबारी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्यातील सदर वाहतूक समस्येची दखल घेतली आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारची जड अवघड वाहनांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सर्व शहराचे मार्गावरून वाहतुकीस बंदी करण्यात येत असून सदरच्या जड अवजड वाहनांना रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत वाहतुकीस परवानगी देण्यात येत आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधीसूचना ही जीवनावश्यक वाहने,पोलीस वाहने,फायर ब्रिगेड,रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.सदरचे अधिसूचना 25 सप्टेंबर 2021 रोजी पासून ते पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहील असे वाहतूक नियंत्रण अधिसूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version