ट्रॅफिक जॅमने पर्यटक रस्त्यावरच; लग्नसराई,उन्हाळी सुट्टीचा मोठा फटका

। माणगाव । प्रतिनिधी ।
सलग सुट्ट्यांमुळे एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांची पाऊले रायगडकडे वळली खरी,पण लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई -गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दरम्यान ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटकांना रस्त्यावरच बराच काळ थांबावे लागल्याने सार्‍यांचाच हिरमोड झाला.वाहतूक कोंडी सोडवितांना पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली.
पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्याचे काम संथ गतीने सुरु आहे. तेथून पुढे असणार्‍या दुसर्‍या टप्यात इंदापूर ते कशेडी घाटा पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्याचे काम संथगतीने चालू असून त्यातच यंदाचे वर्षीही मोठ्या प्रमाणात एप्रिल व मे महिन्यात लग्न असल्याने अनेकांची लगीनघाई तर कांहीची उन्हाळी सुट्टीसाठी लगबग त्यातच पर्यटकांची गर्दी यामुळे महामार्गावर तासनतास प्रवाशांना अडकून पडावे लागत आहे. माणगाव हे दक्षिण रायगडचे प्रवेशद्वार असल्याने तसेच मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बाजारपेठेत मोठया प्रमाणात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत वाहतुकीची कोंडी सतत तीन दिवस सुरूच होती. त्यामुळे ही वाहतुकीची कोंडी माणगावकरांसह सर्वांचीच डोकेदुखी ठरली असून माणगावात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम भेडसावत आहे.
रुंदीकरण रेंगाळले
माणगाव बाजारपेठेतून जाणार्‍या महामार्गाचे रुंदीकरण कधी होणार ? याबाबत माणगावातील नागरिकांतून संभ्रम कायम आहे. मात्र या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलद गतीने झाल्यास माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमचा निकाली निघेल अशी पर्यटकातून चर्चा आहे. शासनांनी या प्रश्‍न लवकर निकाली काढावा अशी मागणी होत असून प्रवाशांना आपल्या कामाविना तासनतास रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे.
इंदापूर ते महाड दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात दिवसेंदिवस होत असून या मार्गावरून प्रवाशांना प्रवास असुरक्षित वाटत आहे. या दरम्यानच्या मार्गावर अनेकांचे अपघातात निष्कारण बळी गेले आहेत. पहिल्या टप्याचे धीमी गतीने सुरु असणारे काम व दुसर्‍या टप्याचे काम अध्यापहि अपूर्णच असल्यामुळे चौपदरीकरणाचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाचे काम एका वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती. मात्र इंदापूर व माणगाव शहरातील बायपासला रेल्वे ट्रॅकवर उड्डाण पूल नियोजित आहे. तर माणगाव बायपास हा वनविभागाच्या जमिनीतून जात असल्याने तो मंजुरीमध्ये अडकला आहे. तसेच शेतकर्‍यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍नही कायम राहिला आहे. हा गुंता कधी सुटणार हा प्रश्‍न पाच वर्षानंतरही अनुत्तरीतच राहिला आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाचा मार्ग खडतर राहिला आहे. माणगाव कळमजे पुलाजवळून नाणोरे गावालगत या बायपास रस्त्याचे काम 2017 मध्ये सुरु झाले. पाच वर्षात हे काम 5 टक्के करण्यात आले. हा बायपास रस्ता सात कि.मी. चा असून तो माणगाव शहराबाहेरून काढण्यात आला आहे.मात्र त्याचे काम अद्याप सुरुच न झाल्याने नियमित वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version