सावित्री खाडी पूलावरील वाहतूक महिनाभर राहणार बंद

। अलिबाग । प्रतिनिधी ।
विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडी-पूलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूलाच्या दुरुस्तीकरिता तसेच कोणतीही दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने दि.10 जानेवारी ते दि.10 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या कार्यक्षेत्रातील विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडीवरील टोळ पूल हा एकूण 157 मीटर लांबीचा मोठा पूल आहे. हा पूल कमकुवत झाल्याने अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र मंडळ (पूल) यांनी सुचविल्याप्रमाणे पूलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश मे.डायनासोर काँक्रीट ट्रीटमेंट प्रा.लि.यांना देण्यात आले असून दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीत या पूलाच्या एकूण पिअरपैकी 3 पिअरचे काम पूर्ण झाले असून, अन्य दूरुस्ती करण्याचे बाकी आहे. आता पूलाच्या बेअरिंग बदलणे व पेडस्टची दुरुस्ती करण्यासाठी पूलाच्या गर्डर सहित स्लॅब उचलणे आवश्यक आहे. बेअरिंग बदलणे, पेडस्टलची दुरुस्ती करणे, एक्स्पन्शन जॉईंट बदलणे, या कामांसाठी महिन्याभराचा कालावधी आवश्यक आहे.

या कालावधीत दापोली, मंडणगड, श्रीवर्धन येथे जाण्यासाठी पर्यायी वाहतूक लोणेरे मार्गे श्रीवर्धन लोणेरे रस्ता रामा-98, म्हाप्रळ आंबेत पुरार रस्ता रामा-101 या मार्गे करणे सोयीचे होईल. तसेच महाड मार्गे बाणकोट म्हाप्रळ, महाड, भोर, पंढरपूर रस्ता राममा-965 डीडी या मार्गे वाहतूक करणे सोयीचे होईल, असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी कळविले आहे.

Exit mobile version