| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर तळवडे, कोल्हारे या गावांना जोडणारा पूल आहे. त्या पुलावर असलेला पृष्ठभाग हा खड्ड्यांनी व्यापला असून त्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालक यांना कसरत करावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची निर्मिती 15 वर्षापूर्वी करण्यात आली. या पुलाच्या निर्मितीमुळे उल्हास नदीच्या पलीकडे असलेल्या तळवडे, पिंपळोली, भाकरीपाडा, आंत्रट, काळेवाडी, गुडवण या भागातील रहिवाशी यांना जवळचा मार्ग निर्माण झाला आहे. तर कोल्हारे, भोपळे आणि धामोते तसेच नेरळ भागातील रहिवाशी यांना देखील तळवडे भागात जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला होता.
मात्र, या पुलावर टाकण्यात आलेले डांबर काही वर्षात निखळले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे या पुलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मागील काही वर्षात बांधकाम खात्याने पुलाचा 50 मीटर लांबीचा पृष्ठभागाचे डांबरीकरण केलेले नाही. पावसाळ्यात पुलाचा संपूर्ण पृष्ठभाग पाण्याखाली गेला असल्याने कोणत्या ठिकाणी खड्डा आहे आणि कुठे पूल खचला आहे हे दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांना धोका पत्करून वाहने चालवावी लागत आहेत.
परिणामी वाहनचालकांसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाचे दोन्ही टोक हे उंच झाले असून पुढील सर्व भाग हे खोलगट झाल्याने त्या ठिकाणी साचून राहणारे पाणी पुलाखाली पडत नाही. त्यामुळे या साचलेल्या पाण्याने पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पुलावर डांबरी पृष्ठभाग टाकण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी संदीप मसणे यांनी केली आहे.







