। अलिबाग । प्रतिनिधी ।
सणासुदीच्या काळात दारु पिऊन वाहन चालविणार्या चालकांना जिल्हा वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. मद्यधुंद वाहन चालकांवर दोन दिवस कारवाई करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत 30 वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
जिल्ह्यामध्ये गुरुवारी होलिकोत्सव सण साजरा करण्यात आला. त्यानंतर दुसर्या दिवशी धुळीवंदननिमित्त ठिकठिकाणी रंगांची उधळण करण्यात आली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या समुद्रकिनारी तसेच ग्रामीण भागात गावे, वाड्यांमध्ये एकमेकांवर रंग उधळून धुळवड साजरी केली. दरम्यान, काही महाठग दारु पिऊन वाहन चालवित असल्याचा प्रकार जिल्हा वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या नाक्यांवर वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, दारु पिऊन वाहन चालविणार्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिल्याचे चित्र दिसून आले. दारु पिऊन वाहन चालविणार्या चालकांची तपासणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली. त्यावेळी अनेकजण त्यात सापडल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.