बेशिस्त चालकांना दणका!

जिल्हा वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

| अलिबाग | प्रमोद जाधव |

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त चालकांना जिल्हा वाहतूक शाखेकडून दणका देण्यात आला आहे. आठ दिवसांत वेगवेगळ्या वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दारु पिऊन वाहन चालविणे, टीबल शीट असणे, विना परवाना वाहन चालविणे, अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2 हजार 651 चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईतून त्यांच्याकडून 27 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेकडून प्राप्त झाली आहे.

रायगड जिल्हा पर्यटनाबरोबरच औद्योगिकीरणाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. वेगवेगळे जिल्ह्यात प्रकल्प उभे असून काही प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, मुरूड, काशीद, श्रीवर्धन, दिघी हे समुद्रकिनारे पर्यटनासाठी महत्वाचे मानले जातात. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल होतात. जिल्ह्यात दुचाकीसह अन्य वाहने खरेदीचा क्रेझ वाढला आहे. वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या गाड्या खरेदी करण्यावर ग्राहक भर देत आहे. मात्र, वाहन चालविताना अनेकजण वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. वाहन वेगात चालविणे, टीबल शीट असणे, क्षमतेपेक्षा प्रवासी वाहतूक करणे, विना परवाना वाहन चालविणे, अशा अनेक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन वाहन चालक करतात. वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्याने अनेक वेळा वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामध्ये जखमी होऊन कायमचे अपंगत्व येते. तर, कधी अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यावर स्वतःच्या व इतरांच्या मृत्यूला चालक कारणीभूत ठरतात.

वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा ही जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेच्या मदतीने वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन कायमच केले जाते. ठिकठिकाणी रस्ता सुरक्षेचे धडे देणे, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने आदीवासी व इतर घटकांना वाहन चालविण्याचा परवाना देणे. दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करणे, अशा अनेक प्रकारची जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. तरीदेखील काही वाहन चालक वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत असतात. जिल्ह्यातील महामार्गासह राज्य, जिल्हा मार्गासह नाक्या नाक्यावर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहे. या वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. मागील आठ दिवसांममध्ये जिल्हा वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत 27 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 2 हजार 651 चालकांना कारवाईचा दणका देण्यात आला आहे. या कारवाईने वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला आहे.


जिल्ह्यातील वाहन चालकांना वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याची सवय राहवी, यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. ठिकठिकठिकाणी फलक लावून जनजागृती केली जाते. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात दंडात्मक कारवाई देखील केली जाते.

सोमनाथ लांडे,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

चालकांवरील कारवाईवर दृष्टीक्षेप

चालक दंड
797 8, 03, 700
370 4, 24, 400
169 1, 68, 300
319 3, 10, 500
367 3, 91, 400
411 3, 78, 000
230 2, 23, 900
088 78, 100
एकूण 27, 78, 300
Exit mobile version