आंबेत पुलाचे 12 कोटी पाण्यात; खांब झुकल्याने वाहतूक बंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच 12 कोटी रुपये खर्च करुन पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुलाचे खांब धोकादायक असल्याची बाब समोर आल्याने या मार्गावरील वाहतुक पुन्हा बंद करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आंबेत पूल धोकादायक बनल्याने दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. जवळपास 12 कोटी रुपये खर्चून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. यासाठी जवळपास वर्षभर वाहतुक बंद ठेवण्यात आली होती.

दुरुस्तीनंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा पूलाचे काही खांब पश्‍चिम दिशेला झुकले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक पूर्णपणे बंद ठेवल्याने एसटी महामंडळाच्या बसेस, नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. मंडणगड, दापोली तालुक्यात जाणार्‍या नागरीकांना महाडमार्गे जावे लागणार आहे. त्यामुळे सावित्री नदीवरील आंबेत या ठिकाणी नवीन पूल उभारावा, अशी स्थानिकांची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव संबधित विभागाकडून राज्यसरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळू शकलेली नाही.

Exit mobile version