। मुरुड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील एका हॉटेलमधील जलतरण तलावात पाच वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.१८) रोजी घडली. माही चक्रधर ताकभाते असे या मुलीचचे नाव असून, तिच्या वडिलांनी मुरुड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माहीचे वडील चक्रधर ताकभाते हे सांगवी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते आपल्या कुटुंबासह व चुलत भाऊ अमोल ताकभाते (गट विकास अधिकारी) यांच्या कुटुंबासह मुरुडमध्ये पर्यटनासाठी आले होते. त्यांनी ‘सी शेल ’ हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली होती. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर दोन्ही कुटुंबातील महिला एका खोलीत गप्पा मारत बसल्या, तर पुरुष दुसऱ्या खोलीत गेले. दरम्यान, माही आणि तिची चुलत बहीण आन्वी दोघीही कोणाला काही न सांगता हॉटेलच्या तळमजल्यावर खेळण्यासाठी गेल्या. माहीने जलतरण तलावात उतरल्यावर पाण्याची खोली लक्षात न आल्याने ती बुडू लागली. हे पाहून आन्वीने धावत जाऊन मोठ्यांना सांगितले. माहीला तात्काळ पाण्याबाहेर काढून मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला सी.पी.आर. आणि ई.सी.जी.द्वारे वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र, तिचा श्वास बंद झाल्याचे निष्पन्न झाले आणि दुपारी अडीच वाजता मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.