भीषण अपघात! घोणसे घाटात ट्रेलरचा चक्काचूर; महिलेचा मृत्यू

। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरत असलेल्या घोणसे घाटात बुधवारी (दि.5) ट्रेलरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. म.रा.र.विकास मंडळाकडून योग्य त्या उपाययोजना व रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्यामुळे घोणसे घाटात सातत्याने अपघात होत आहेत. या महिन्यातील ही तीसरी घटना असून प्रशासनाला जाग केव्हा येणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, एमएच 43 वाय 7664 या क्रमांकाचा सीमेंट ब्रिक्सने भरलेल्या ट्रेलरची तीव्र उतारावर संरक्षक भिंतीला धडक लागली. 30 ते 35 टन क्षमतेच्या ट्रेलरच्या अपघातात केबिनचा चक्काचूर झाला. याबाबतची माहिती मिळताच मतदकार्य सुरु करण्यात आले. मृतांमध्ये चांदोरला बसलेली खरसईतील महिला देवका रामा भुनेसर (वय 55) यांचा मृत्यू झाला असून चालक सद्दाम शहा (वय 35, भिवंडी), किशोर पांडुरंग हेलोंडे (वय 37, बेटकर वाडी), योगेश काप (वय 26, निगडी), अतिष तांबे (वय 36, कांदळवाडा) या चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी अपघातस्थळी पोहोचून त्वरित मदतकार्य सुरु केले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी देवघर-घोणसे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनिल महामुनकर, अमोल कोतवाल, सचिन महामुनकर सुरेंद्र शिर्के, विलास कदम, योगेश महागावकर, अमोल गणवे, शरद कांबळे आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version