। वावोशी । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील देवळोली गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 13) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने जात असलेला ट्रेलर अचानक पलटी झाला. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कसळखंडहून पाताळगंगा एमआयडीसीकडे गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास वेगाने जाणाऱ्या ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर रस्त्यावरच पलटी झाला. सुदैवाने कोणतेही दुसरे वाहन त्या ठिकाणी नव्हते. या अपघातानंतर काही काळ वाहतूक व्यवस्थाही कोलमडून पडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, ट्रेलर पलटी झाल्याने चालकाला मदत मिळायला बराच उशीर झाल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून, नेमका अपघात कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटले की अन्य कोणतेही तांत्रिक कारण होते, याचा खुलासादेखील लवकरच केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
भीषण अपघात! ट्रेलर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू
