मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रेलर दरीत कोसळला

। खोपोली । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळ सोमवारी (दि.12) सकाळी ट्रेलर कठड्याला धडकून खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कळंबोली येथील ट्रेलरचालक कृष्णा जायभाय गंभीर जखमी झाले. अपघातानंतर केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा आणि हेल्प फाऊंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्नपूर्वक बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर हा माल घेऊन विशाखापट्टणम येथून पेणच्या दिशेने जात होता. खोपोली एक्झिटजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलरने महामार्गावरील कठड्याला जोरदार धडक दिली आणि तो खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रेलरच्या केबिनचे नुकसान झाले आणि चालक आत अडकून गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबीची बचाव यंत्रणा आणि हेल्प फाऊंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे प्रथम खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version