पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
| नागपूर | प्रतिनिधी |
राज्य विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात आलं आहे. पण आपल्या आंदोलकानी दखल घेतली जात नाही म्हणून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधान भवनाच्या दिशेला थेट मोर्चाच काढला. हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. नागपुरात मुख्यमंत्री युवाकार्य आणि प्रशिक्षणार्थी तरुणांचं 9 डिसेंबरपासून आंदोलन सुरु आहे. पण आपल्या या आंदोलनाची प्रशासन आणि सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलक प्रचंड आक्रमक झाले. आंदोलकांनी अखेर विधान भवनावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून आता आंदोलकांची धरपकड सुरु आहे.
आंदोलक पोलिसांचं सुरक्षाकवच तोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रशिक्षणार्थी यांनी 11 महिने प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर सरकारने शब्द पाडला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय. आंदोलकांकडून आधी शांततेत आंदोलन सुरु होतं. पण आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही म्हणून त्यांनी लोटांगण मोर्चा विधान भवनाच्या दिशेला काढला. पण या मोर्चा पोलिसांनी अडवला. ”आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत. आमची मागणी आहे, आमचा जीआर निघालाच पाहिजे”, असं आंदोलक तरुण म्हणाले.
11 महिने प्रशिक्षण घेऊन आम्हाला योग्य नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आमचे 11 महिने वाया गेले, अशी तक्रार आंदोलक तरुणांची आहे. सरकार या तरुणांना प्रशिक्षणाचे पैसे देणार होतं. पण त्यांना पैसे मिळाला नसल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. दरम्यान, आंदोलक इतके आक्रमक झाले की, पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापटी होताना दिसली. तर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली.
राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. याबाबत विस्तृत माहिती घेतली जाईल. त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, तसेच त्यांच्या मागण्या कुठे अटकल्या आहेत याची सविस्तर माहिती घेतली जाईल. त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची समस्या सोडवण्यात येतील. तरुणांची अडचण सोडवली जाईल, अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली.





