विद्यार्थ्यांनी बनवल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायत व इनरव्हील क्लब खोपोली यांच्या वतीने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे विशेष प्रशिक्षण शिबिर टॉपवर्थ इंग्लिश मिडीअम स्कूल पाली येथे नुकतेच आयोजित करण्यात आले. माझी वसुंधरा अभियानाच्या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
तज्ञ मार्गदर्शकांनी शाडू मातीचे महत्व, मूर्ती बनवण्याच्या सोप्या तंत्रांसोबत रंगकामासाठी पर्यावरण पूरक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच इनरव्हील क्लब खोपोली यांच्या वतीने कचरा नियोजन आणि पर्यावरण संवर्धन याबाबत पथनाट्य सादरीकरण केले गेले. शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी पुस्तके वाटप केली. मुख्याधिकारी आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित करताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाचे दुष्परिणाम व शाडू मातीच्या मूर्तीचा पर्यावरणपूरक लाभ स्पष्ट केला. या उपक्रमामुळे गणेशोत्सव साजरा करताना निसर्ग संवर्धनाची जाणीव नागरिकांमध्ये रुजविण्यास मदत होणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. तसेच पाली नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या शिबिरात नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके, आरिफ मणियार, प्रतिक्षा पालांडे, सर्व नगरसेवक, नगरसेविका सर्व सभापती, दिना शहा, मधुमिता पाटील, क्षमा आठवले, सुलभा बिनीवाले, राजश्री मुंदडा, सुमिता महर्षी, कोणकर, शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.






