| रसायनी | वार्ताहर |
बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण रायगड मार्फत ज्युटपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण मोहोपाडा आळी आंबिवली येथे पार पडले. महिलांनी फक्त गृहिणी न राहता स्वयंरोजगाराकडे वळावे त्यासाठी बँक ऑफ इंडिया व स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था रायगड पूर्णपणे सज्ज आहे. तसेच, ज्यूट वस्तू बनविण्याचा व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. तसेच, लहान कामातून मोठी सुरुवात करता येईल आणि त्यातून महिला उद्योजिका निर्माण होतील. प्रशिक्षणाच्या शेवटच्यादिवशी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, ललित कुमार भिसे, सुमितकुमार धानोरकर उपस्थित होते.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक यांनी या महिलांनी उत्तम प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण का गरजेचे आहे, हे सांगून प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे प्रशिक्षण पुर्ण होण्यासाठी सीआरपी सुप्रिया गायकर यांनी मोलाचे सहकार्य करुन 33 प्रशिक्षणार्थींचे 13 दिवस प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी महिलांना प्रशिक्षणाविषयी संपूर्ण ज्ञान, यासोबत उद्योजकीय सक्षमता, संवाद कौशल्य, मार्केटिंग ध्येय, निश्चिती बँकिंग, कर्ज अशा विविध विषयांबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्लॅस्टिक पूर्णपणे बंद होवून कापडी व ज्युटच्या बॅगचा वापर व्हावा, हे यामागील ध्येय असल्याचे सीआरपी सुप्रिया गायकर यांनी सांगितले.