गद्दार गँगचा मंत्रिपदासाठी हावरटपणा- आदित्य ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी ।

महायुतीला ईव्हीएमने, निवडणूक आयोगाने बहुमत दिल्यानंतरही मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दोन आठवडे लागले होते. त्यानंतर मंत्रिपदासाठी गद्दार गँगमध्ये तुला काय मिळणार, मला काय मिळणार, कोणते मंत्रिपद मिळणार, खायला काय मिळणार, अशी भांडणे सुरू आहेत. हा स्वार्थीपणा, हावरटपणा लोकांसमोर आला आहे. हे विचार महाराष्ट्रासाठी भयानक आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदासाठी महायुतीमध्ये सुरू असलेल्या भांडणावर टीका केली आहे. बहुमत मिळूनही खात्यांसाठी वाद सुरू आहेत, हे फार चुकीचे आहे. महाराष्ट्राचे चित्र इतके भयानक कधीही नव्हते आणि नसावे अशीच आपली ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. मंत्रिपदासाठी कुणी जॅकेट शिवून तयार असते तर कुणी प्रार्थना करत असते. हे सगळे ठीक आहे, पण बहुमत मिळाल्यानंतर स्वार्थीपणा बाजूला ठेवून तातडीने लोकसेवा सुरू करायला हवी होती, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच, शिंदे सरकारने रस्ते घोटाळ्यांमध्ये 12 हजार कोटींचा मलिदा लाटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी या रस्ते घोटाळ्यांची अधिकृत चौकशी करावी, अशी विनंतीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे. फडणवीस सरकारची रस्ते घोटाळ्यावर खरोखरच कारवाई करण्याची इच्छा असेल तर त्यांना तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या कार्यकाळातील मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर या दोन पालकमंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवावे लागेल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version