सिडको भूखंडाचे पालिकेकडे हस्तांतरण

60 वर्षाच्या लीजवर 180 भूखंड ताब्यात
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल महापालिकेत समाविष्ठ सिडको वसाहती मधील सार्वजनिक वापरातील विविध भूखंड पालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यत विविध प्रकारच्या 255 भूखंडांपैकी 180 भूखंड पनवेल महापालिकेच्या ताब्यात आले आहेत. यापैकी अनेक भूखंडांचे करारपत्र होऊन पालिकेने संबंधित भूखंडाचे पैसे सिडकोला अदाही केले आहेत.

या भूखंडामध्ये प्रामुख्याने आयुक्त, महापौर बंगल्यासाठी भूखंड, चारही प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालय, खेळाची मैदाने, गार्डन आदीचा समावेश आहे. मध्यंतरी काही भूखंडांवर सिडकोमार्फत आकारल्या जाणार्‍या जीएसटी कराला पालिकेमार्फत विरोधही दर्शविण्यात आला होता. मात्र, आयुक्त व महापौर बंगल्याकरिता दिलेला भूखंड वगळता उर्वरित भूखंडांना जीएसटी माफ करण्यात आला आहे.या भूखंडांच्या हस्तांतरासाठी पनवेल महापालिका सिडको प्रशासनासोबत समन्वय साधत आहे.

255 भूखंडांपैकी सिडकोने दिलेल्या 180 भूखंडांपैकी काही भूखंडांचे अलॉटमेंट लेटर पालिकेला देण्यात आले आहेत. या भूखंडामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र, शाळा, समाजमंदिर, अग्निशमन केंद्र आदीचा समावेश आहे.सिडकोने हस्तांतरित केलेल्या भूखंडामध्ये 55 उद्यानांचा समावेश आहे. या भूखंडाच्या हस्तांतरात सामाजिक सेवेतील उद्याने, बगिचे, मैदाने आदी प्रतिचौरस मीटर 60 रुपये दराने सिडकोकडून देण्यात आले आहेत.

Exit mobile version