बेकायदा विक्री झाल्याबद्दल संशय
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमधील सर्व जमीन वन खात्याची असून, त्यावर महसूल विभागाकडे काही भूखंड हस्तांतरण केले होते. त्यातील एका भूखंडावर कापडिया मार्केट उभे राहिले होते. सदर जागेवर माथेरानमधील स्थानिक लोकांसाठी व्यवसाय उभारणीसाठी हा भूखंड माथेरान नगरपरिषदेला दान केला होता. त्या जागेवरील गाळे विक्रीसाठी नव्हते. मात्र, कपाडिया मार्केटमधील गाळ्यांची विक्री झाली असल्याचे बोलले जात असून, पालिकेच्या या कार्यवाहीची चौकशी रायगड जिल्हाधिकारी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माथेरान मध्ये बाजारपेठ भागातील मशिदी समोर कपाडिया मार्केट उभे असून, सदर ठिकाणी स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधून दिले होते. 1919 मध्ये सदर वास्तू कपाडिया यांनी आपल्या पत्नीच्या नावे माथेरान नगरपरिषदेला दान दिली आणि या वास्तूचे मालक माथेरान नगरपरिषद बनली. त्यानंतर कपाडिया मार्केटमधील गाळे तेथील भाडेकरूंना वापरण्यास दिले होते. त्या गाळ्यांची विक्री करता येत नसल्याचे माथेरानमधील जाणकार सांगत असतात. दुसरीकडे एखादी दान केलेली वास्तू ही कोणाला विकता येत नाही, असा नियम निबंधक खात्यात आहे. तोच नियम माथेरान मधील कपाडिया मार्केटबद्दल लागू आहे. त्यामुळे कपाडिया मार्केट मधील त्या गाळ्यांचे मूळ भाडेकरू यांच्या वारसाशिवाय सर्व साधारण हस्तांतरण होऊ शकत नाही.
दरम्यान, कपाडिया मार्केटमधील एक जून 2022 च्या कर संकलन आकारणी यादीनुसार नऊ गाळ्यांचे हस्तांतरण झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यातील पाच गाळे हे मूळ भाडेकरू यांचे वारस यांच्या नावावर वारसाहक्काने हस्तांतरित झाले आहेत. तर, चार गाळे यांची थेट विक्री होऊन मूळ भाडेकरू यांच्याऐवजी नवीन मालक यांची नावे कर आकारणीमध्ये समोर आली आहेत. त्यामुळे भाडेकरू यांनी आपल्याकडील भाड्याच्या गाळ्यांची विक्री केली असल्याचे उघड झाले आहे. माथेरान पालिकेने आपल्याच मालकीचं वास्तू आणि एखाद्या व्यक्तीने दान केलेली वास्तूमधील गाळ्यांची विक्री केली आहे हे कर आकारणी संकलनवरून दिसून येत आहे. त्यामुळे माथेरान पालिकेची परवानगी न घेता कपाडिया मार्केटमधील गाळ्यांची विक्री करणार्या मूळ भाडेकरू यांच्यावर आधी कारवाई करण्याची गरज आहे. माथेरान पालिकेने घेतलेल्या या विक्री आणि हस्तांतरणबद्दल रायगड जिल्हाधिकारी यांनी पालिकेच्या निर्णयाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.