जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रशासकीय कारणास्तव अकरा जणांना केले कार्यमुक्त

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड पोलीस दलातील वेगवेगळ्या विभागात व पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी मंगळवारी (दि.17) हा आदेश काढला आहे. त्यात 3 महिला पोलीस अधिकारी यांचा समावेश असून प्रशासकीय कारणास्तव या बदल्या झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

रायगड पोलीस दलातील कोलाडपासून दिघीसागरी व अलिबाग अशा विविध पोलीस ठाण्यात तसेच भरोसा सेल, जिल्हा वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष अशा अनेक विभागात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार, एकाच पोलीस ठाण्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्याने प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बदलीमध्ये 8 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 3 पोलीस निरीक्षक यांचा समावेश असून त्यामध्ये 3 महिला पोलीस अधिकारी आहेत.

कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांची खोपोली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांची बदली अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे. गोरेगावमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांची बदली मांणगाव पोलीस ठाणे येथे केली आहे. माथेरानचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांची बदली कर्जत पोलीस ठाण्यात केली आहे.

अलिबाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे यांची माथेरानमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. खालापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांची दिघी सागरी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. माणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार यांची गोरेगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांची कोलाड पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांची रसायनी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. भरोसा सेलमधील पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांची जिल्हा वाहतूक शाखेत बदली केली आहे. तसेच, नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांची भरोसा सेल अलिबागमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी प्रलंबित गुन्हे, अर्ज, प्रकरणी कामे लेखी स्वरुपात पोलीस ठाण्यातील अन्य पोलीस अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करून नवीन नेमणूकीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करावे, अशी लेखी सुचना देण्यात आली आहे.

Exit mobile version