पी. चिदंबरम यांचे मतदारांना आवाहन
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणांमुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु, मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसर्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण झाली असून, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा ही राज्ये पुढे गेली आहेत. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार गुजरातच्या इशार्यावर चालत असून, आता महाराष्ट्रात परिवर्तन करून मविआचे सरकार आणा, असे आवाहन माजी केंद्रीय अर्थमंत्री खासदार पी. चिदंबरम यांनी केले आहे.
टिळक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना पी. चिदंबरम यांनी आकडेवारीसह भाजपा राजवटीत महाराष्ट्राची अधोगती कशी झाली हे सविस्तरपणे सांगतिले, ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 9.6 वरून 7.6 टक्क्यांवर घसरले आहे, कृषी क्षेत्रात 4.5 टथ्थ्यांवरून 1.9 पर्यंत घसरण झाली आहे, सेवाक्षेत्रात 13 टक्क्यावरून 8.8 टक्के घरसण, बांधकाम क्षेत्रात 14.5 टक्क्यांवरून 6.2 टक्के घरसण झालेली आहे, वित्तीय तूट वाढलेली आहे. सरकार पैसे खर्च करत आहे, पण कोणत्याही क्षेत्रात वृद्धीदर वाढलेला दिसत नाही. महाराष्ट्रात आज बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून, बेरोजगारीचा दर 10.8 टक्के आहे. पगारी नोकरी करणार्यांच्या संख्येत 40 टक्क्यांवरून 31 पर्यंत घरसण झाली आहे, तर 40 टक्के लोक स्वयंरोजगार करत आहेत. 18 हजार पोलीस भरतीसाठी 11 लाख अर्ज आले होते, तर 4600 तलाठी पदांसाठी 11.5 लाख लोकांनी अर्ज केले होते. यातून बेकारीची अवस्था किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार का मिळत नाहीत यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले की, राज्यात नोकर्या आहेत कुठे? महाराष्ट्रातील तरुण मुले मुली व त्यांच्या पालकांनी 20 तारखेला मतदान करताना नितीन गडकरी यांचे ‘नोकर्या कुठे आहेत?’ हे वक्तव्य लक्षात ठेवूनच मतदान करा.
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास मोठे उद्योग तयार होते, त्यासाठी परस्पर सामंजस्य करारही केले, प्रकल्पासाठी जागा निश्चित केली, पण त्यानंतर हे प्रकल्प दुसर्या राज्यात गेले. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग्ज प्रकल्प, तळेगावमध्ये होणारा सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, नागपूरला होणारा टाटा एअरबस प्रकल्प हे महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात गेले हे लहान मुलगाही सांगू शकतो. रोजगार देणारे मोठे प्रकल्प जर दुसर्या राज्यात गेले, तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळणार कुठून? असा सवाल चिबंरम यांनी उपस्थित केला.
शेतकर्यांच्या बाबतीतही भाजपा सरकारचे ठोस धोरण नाही. उलट, भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. आज महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, मागील एका वर्षात महाराष्ट्रात 2851 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. शेतकरी मोठ्या संकटात असताना त्यांना कर्जमाफी देऊन त्याच्यावरचे ओझे उतरवले पाहिजे. पण, भाजपा सरकारने शेतकर्यांना कर्जमाफी दिली नाही. महाराष्ट्रातील 17.4 टक्के लोकसंख्या दारिद्य्ररेषेच्या खाली आहे, असेही चिदंबरम यांनी सांगितले.
रोजगारनिर्मितीवर बोलताना चिदंमबर म्हणाले की, रोजगार आहेत, वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रातही अनेक लोकांची गरज आहे. आज या क्षेत्रात पदे रिक्त आहेत, ती भरली पाहिजेत. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही रोजगारनिर्मितीचा आराखडा दिला आहे, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू.बी. व्यंकटेश, राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चरणजित सप्रा आदी उपस्थित होते.