गाठेमाळ शाळेला मिळाली उर्जितावस्था

समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळेचा कायापालट

| सुधागड -पाली । वार्ताहर ।

 सुधागड तालुक्यातील गाठेमाळ शाळेची निसर्ग व तोक्ते वादळात पडझड झाली होती. अनेक समस्यांनी शाळेला वेढले होते. त्यातच कोरोना व आर्थिक मदतीच्या अभावाने शाळेत आवश्यक डागडुजी करणे ही शक्य होत नव्हते. मात्र शाळेचे मुख्याध्यापक सागर शिंदे व शिक्षिका आशा आर्डे यांनी शाळेला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी कंबर कसली व दाते आणि समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून आता शाळेचा आमूलाग्र कायापालट घडवून आणला आहे.

मुख्याध्यापक सागर शिंदे सांगितले की, निसर्ग वादळात शाळेची पडझड झाली, किचन नादुरस्त झाले, कोरोनो काळ संपल्यावर शाळेला तातडीने मदतीची गरज होती. या दोन वर्षात चांगली दिसणारी शाळा पूर्णपणे खराब दिसू लागली होती. भिंतीचे प्लास्टर गळून पडले होते. वर्गखोली गळायला लागली होती. पावसाळ्यात अक्षरशः वर्गात बादल्या ठेवाव्या लागत होत्या. गळणारे पाणी बादल्यात पडत होते. अध्यापन करत असतांना या सर्व गोष्टी सांभाळण्यात बराचसा वेळ जात होता. अशा परिस्थिती मध्ये शाळेचे रूप पालटुन आवश्यक व चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. अशातच हर्षदा दईसरिया यांच्याकडून शाळेला पहिली मदत मिळाली.त्यांनी शौचालय व किचन शेड दुरुस्त करून दिले.

प्राइड इंडिया या संस्थेकडून पुढे मदत मिळाली. त्यांनी गळणार्‍या वर्गखोली वर पत्रे टाकून दिले. त्यामुळे पावसाचे गळणारे पाणी पूर्णपणे थांबले. प्राइड इंडिया कडून एका वर्गखोली आतून बाहेरून सुरेख व आकर्षक रंगरंगोटी करून मिळाली. गळणारी व पावसाळ्यात सतत बादल्या ठेवावी लागणारी वर्ग खोली सुरेख झाली. त्यामुळे मुलांनाही शिकण्यात आनंद मिळू लागला. शाळेसाठी इतर अनेकांनी मदत केली. कपाट, टेबल, खुर्च्या खेळाचे साहित्य देखील शाळेला मिळाले. अशा प्रकारे शाळेचा कायापालट झाला.

अनेक सामाजिक संस्था व दात्यांनी मिळून शाळेला सर्वतोपरी मदत व सहकार्य केले आहे. अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे. यामुळे शाळेचे रूप पूर्णपणे पालटले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आवश्यक सेवासुविधा मिळतात. डिजिटल संसाधनांच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञानकण गिरवितात. यामुळे विद्यार्थी शाळेत रमू लागली आहेत. अध्ययनात लक्ष केंद्रित होत आहे.

सागर शिंदे, मुख्याध्यापक, गाठेमाळ शाळा
Exit mobile version