अग्नीतांडव! रिलायन्स कंपांऊंडजवळील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

। उरण । प्रतिनिधी ।

खोपटा खाडी पुलाजवळील रिलायन्स कंपाऊंडजवळील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागल्याची दुदैवी घटना गुरुवारी (दि.16) दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली. ही बाब निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळविले. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या आगीची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की, आगीचे लोट आकाशात पसरले होते. त्यामुळे प्रवासी तसेच नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते. उरण तालुक्यातील प्रकल्प, कंटेनर यार्ड आणि ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना महावितरण विभागाच्या विद्युत पुरवठा करण्यात येतो. परंतु महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी, ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलची चोरी, आगी लागल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

या आगीच्या घटनेची माहिती सिडको, जेएनपीटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण आणले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे महावितरण कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. उरण महावितरण विभागाचे उप अभियंता विजय सोनवणे यांना घटनेची माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला. त्यामुळे विद्युत पुरवठ्यासंदर्भात उप अभियंता विलास सोनवणे यांना किती गांभीर्य आहे, हे यावरून सिद्ध झाले.

Exit mobile version