‌‘ट्रान्सफॉर्मर गँग’ गजाआड

10 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपी अटकेत

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ, कर्जत, खालापूर आणि खोपोली परिसरात ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नेरळ आणि कर्जत पोलिसांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे मुंब्रा (ठाणे) येथून पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. 13 जानेवारी 2026 रोजी नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे धामोते येथील ‌‘डिस्कव्हर रिसॉर्ट’समोरील ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या होत्या. यावेळी ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल खाली सांडवून सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी 14 जानेवारी रोजी नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 303(2) व 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकारच्या वाढत्या चोऱ्यांची गंभीर दखल घेत रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार नेरळ व कर्जत पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी वॅगन आर कारचा (एमएच 43 सीई 8405) शोध सुरू करण्यात आला.

24 जानेवारी रोजी ही कार नेरळ-कर्जत-बदलापूर मार्गावर संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी सापळा रचून कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नसीम नसीर साहा (25), रोजन लतीफ अली (27), मोहम्मद हनीफ फारूख (24), इब्राहीम जान मोहम्मद खान (31) व जकाउल्लाह मोहम्मद इब्राहीम खान (26) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या कसून चौकशीत आरोपींनी धामोते येथील चोरीसह डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 दरम्यान कर्जत, खालापूर व खोपोली परिसरातील अनेक ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे 450 किलो तांब्याच्या तारा तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या यशस्वी कारवाईमुळे नेरळ व कर्जत पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे. या तपासात पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक सुशील कजरोळकर, सुशांत वरक (कर्जत पोलीस ठाणे) यांच्यासह पोलीस हवालदार येरूणकर, समीर भोईर, संतोष साळुंखे, वाघमारे, शिवाई केकान, आशू बेंद्रे व वांगणेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Exit mobile version