गुहागरातील 300 नौकांवर बसविले उपकरण
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मासेमारीसाठी मच्छिमारी नौका खोल समुद्रात जातात. अनेकवेळा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे खोल समुद्रात मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ मदत मिळत नाही. या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर हे उपकरण बसविण्यात येणार आहे. याद्वारे तात्काळ संदेश पाठवून मदत मिळविणे सोपे होणार आहे. याचे उद्घाटन पडवे येथून झाले आहे.
पडवे बंदरात लहान-मोठ्या 130 मासेमारी करणार्या परवानाधारक बोटी आहेत. त्यापैकी 6 सिलिंडरच्या बोटींवर ट्रान्सपॉन्डर हे उपकरण बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आग लागणे, नौकेचे इंजिन खराब होणे किंवा नौका समुद्रात बुडत असल्यास खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश पाठवता येतो. ट्रान्सपॉन्डर उपकरणातील आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळाची माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपद्वारे नियंत्रण कक्षाकडून संदेश पाठविला जातो.
पडवे बंदरातील नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. गुहागर कार्यक्षेत्रातील नौकांवर बसविण्यासाठी 300 ट्रान्सपॉन्डर उपकरण उपलब्ध झाली आहेत. पडवेनंतर इतर बंदरांतील नौकांवर हे उपकरण बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मच्छिमारी संस्था व नौका धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुहागर मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्याला दोन हजार उपकरणे
रत्नागिरीत जिल्ह्यातील सर्वच मच्छीमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर्स उपकरण बसविण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी सुमारे दोन हजार उपकरणे मिळणे अपेक्षित आहेत. पहिल्या टप्प्यात सहाशे उपकरणे मत्स्य विभागाला प्राप्त झाली आहेत.