| रायगड | प्रतिनिधी |
वाळूमाफिया राज्यात अनधिकृतपणे वाळू, गौण खनिजांचे उत्खनन करून त्याची वाहतूक करीत आहेत. अनधिकृतपणे होणाऱ्या कृत्यात सहभागी वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी, परिवहन विभागाने पावले उचलली आहेत. याबाबत पहिल्या गुन्ह्यासाठी 30 दिवस, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 60 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाहनास अटकाव केला जाईल. तर, तिसऱ्या गुन्ह्यासाठी थेट वाहन अटकाव करून परवाना रद्द करण्यात येणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृतपणे उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे वारंवार प्रकार घडत असल्याचे निर्दर्शनास येत आहे. महसूल आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी, वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन करून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ठोस कारवाई करण्यात येणार आहे. मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.
मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 113 चा भंग करून सकल भारक्षमतेपेक्षा अतिरिक्त वजनाच्या वाळू व इतर गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या परवानाधारकांवर विभागीय कारवाई करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणास आहेत. या बाबी विचारात घेऊन राज्य परिवहन प्राधिकरणाने 18 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित बैठकीत वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन करून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवान्यावर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्याचे निर्देश राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना दिले आहेत.







