| पनवेल | प्रतिनिधी |
ई-चलन प्रणालीच्या कथित चुकीच्या अंमलबजावणीविरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीच्यावतीने गुरुवारी (दि.5) कळंबोलीतील पुणे-मुंबई मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ई-चलनद्वारे होत असलेल्या कथित अन्यायकारक दंडवसुलीला विरोध करण्यासाठी तसेच प्रणालीतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील ट्रक चालक, बस चालक आणि इतर अवजड वाहन चालक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.दरम्यान, ई-चलन प्रणालीच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत वाहतूकदारांनी सरकारने प्रथम आवश्यक तांत्रिक सुविधा आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून द्यावीत, त्यानंतरच कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.






