वरसगाव भिरा फाट्यावरील प्रवास जीवघेणा

दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळ

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वरसगाव-भिरा फाट्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार संबंधित ठेकेदार असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

महामार्गांवरील कोलाड बाजारपेठेत उड्डाण पुलाचे काम सुरु असून हा मार्ग 500 मीटर अंतरावर वरसगाव फाट्यावर बंद केला असून, या ठिकाणी मातीचे ढिगारे टाकून ठेवले आहेत. परंतु, येथे कोणतेही दिशादर्शक किंवा सूचना फलक नसल्याने अचानक वाहन चालक हे समोरील मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळत आहेत.

काल रात्रीच्या सुमारास एक एर्टिगा गाडी ढिगाऱ्यावर चढली; या अपघातात वाहन चालक थोडक्यात बचावला. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होताना दिसत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 17 वर्षांपासून सुरु असून, ते एका वर्षात पूर्ण ही होईल. यामुळे या महामार्गांवर वाहनांचा वेग वाढणार आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. ते निष्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे हे गतिरोधक वेगाची नशा अपघाताचे कारण ठरत आहे. या गतिरोधकामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात घडत आहेत.

Exit mobile version