बिना इंजिन कव्हर विमानाचा मुंबई ते भुज प्रवास; महासंचालनालयाने दिले चौकशीचे आदेश

। मुंबई । वृत्तसंस्था ।
इंजिन कव्हरशिवाय विमानाने मुंबई ते भुजचा प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलायन्स एअरच्या विमानाने बुधवारी सकाळी 6.30 वाजता भुजकडे जाण्यासाठी उड्डाण घेतले.

दरम्यान, एअरस्ट्रीपमधून बाहेर पडताना विमानाच्या इंजिनचे कव्हर खाली पडले. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आणि विमानाचा भुजकडचा प्रवास सुरू झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली त्यावेळी विमानात 70 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने हे विमान सुरक्षितपणे भुज विमानतळावर उतरवण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी 6.30 वाजता घडली. इंजिन कव्हर पडल्याची बाब लक्षात येताच वाहतूक नियंत्रक कर्मचाऱ्यांनी तात्काळ वैमानिकाला याची माहिती दिली. मात्र असे असतानाही वैमानिकाने विमान पुढे नेले. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिले आहेत.

याबाबत बोलताना नागरी विमान वाहतूक महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात असून, अहवालानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

बाल बाल बचावले
विमानाच्या इंजिनावरील कव्हरला ‘कॉल’ म्हणतात. हे इंजिनला बाहेरील वस्तूंपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते. कॉल नसल्याने उड्डाणादरम्यान यामध्ये हवेतील एखादी वस्तू थेट इंजिनमध्ये अडकण्याची शक्यता अधिक असते. यामुळे विमानाच्या अपघाताची मोठी शक्यता होती.

Exit mobile version