सायन-पनवेल महामार्गावर प्रवास महागला

| पनवेल । वार्ताहर ।
सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे-कोपरा टोलनाक्यावरील टोलच्या दरात सोमवार ( ता.1) पासून वाढ करण्यात आली आहे. या महामार्गावरून प्रवास करणार्‍या मिनी बसला 90 रुपये, तर अवजड वाहनांना 190 रुपयांचा टोल भरावा लागणार असल्याने सामान्य वाहतूकदारांचा महामार्गावरील प्रवास महागला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या महामार्गावरून पनवेलच्या दिशेने प्रवास करणार्‍या वाहनांसाठी खारघर-कोपरा येथे, तर मुंबईच्या दिशेने प्रवास करणार्‍या वाहनांसाठी कामोठे येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. या ठिकाणी खासगी टोलवसुली कंपनीच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या टोलनाक्यावर 1 ऑगस्टपूर्वी प्रवास करणार्‍या मिनी बस चालकांकडून एकेरी प्रवासासाठी 75 रुपयांचा टोल वसूल करण्यात येत होता. आता या दरात वाढ झाल्याने एकेरी प्रवासासाठी 90 रुपये टोल भरावा लागणार आहे, तर ट्रक व बससाठी एकेरी प्रवासाला 190 रुपये टोल आकारला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या टोल नाक्यावरील टोलच्या दरात दर तीन वर्षांत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वाढ करण्यात येत असते. कामोठे कोपरा टोलनाक्यावरदेखील एप्रिल महिन्यात टोलच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, याबाबतचे नोटिफिकेशन उशिरा झाल्याने एप्रिल महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यात टोलच्या दरात वाढ झाली आहे.

– योगेश चौधरी, व्यवस्थापक, कामोठे-कोपरा टोल नाका.

पूर्वीचे आताचे दर (एकेरी प्रवास)
मिनी बस – 75 – 90
ट्रक/बस – 160 – 190

Exit mobile version