। पनवेल । वार्ताहर ।
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन महत्त्वाचे आहे. या करिता पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रजातीच्या वृक्षांची माहिती व नोंदणी असणे आवश्यक असल्याने पनवेल महापालिकेने प्रथमच वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या गणनेमुळे पालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करणे, त्यांची प्रजाती ओळखणे, त्यांचे स्थान मॅपद्वारे निश्चित करणे आणि त्यांचे छायाचित्र काढणे शक्य होणार आहे. वृक्ष सर्वेक्षणाचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा बसेल आणि परिसरातील दुर्मिळ वृक्षांची नोंद होईल. 110 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या पनवेल पालिकेत पूर्वीच्या नगर परिषदेअंतर्गत असलेले भाग, 29 गावे, पाच सिडको वसाहती आणि इतर क्षेत्रांचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार, पनवेल तालुक्याची लोकसंख्या पाच लाख आहे, ज्यात शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश आहे. वृक्षांच्या गणनेसाठी महापालिकेने पर्यावरण विषयात तज्ज्ञ संस्थांकडून निविदा मागवल्या, त्यासाठी वर्षभराचा कालावधी देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1.50 कोटी खर्च अपेक्षित आहे.
महापालिका प्रशासनाकडून पहिल्यांदाच वृक्षगणना करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे खाजगी व सरकारी जागेत किती झाडे आहेत, पालिका क्षेत्रात किती वृक्ष प्राचीन आहेत, आदींची माहिती घेतली जाणार आहे. या गणनेत झाडांची छायाचित्रे, प्रजाती आणि इतर माहिती घेतली जाणार आहे. याबरोबरच झाडांची संख्या नोंद होणार असल्यामुळे झाडांचा तपशील रिअल टाइम डेटामध्ये नोंद केला जाईल, यामुळे वृक्षतोड होत असल्यास त्याची माहिती तातडीने वृक्ष प्राधिकरणाला मिळेल व वृक्षाचे संरक्षण आणि अवैध वृक्षतोड रोखता येईल.
शहराचा विकास महत्त्वाचा असला तरी तो पर्यावरणाच्या किमतीवर होऊ शकत नाही. शहरात 30 टक्के हरित पट्टा असणे बंधनकारक असून त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पालिका क्षेत्रात शेकडो जुनी झाडे आहेत. शहरातील 10 फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या सर्व झाडांची गणना करण्यात येणार आहे.
गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल