| माथेरान | वार्ताहर |
स्वच्छ, सुंदर, हरित अशी ओळख असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ माथेरानमध्ये जंगल भागात काही पॉइंट्सवरील रस्त्याच्याकडेला अनेक वर्षांपासून जुनी वनराई तग धरून डौलाने उभी आहे. यामुळेच ठराविक ठिकाणी हवेत गारवा जाणवतो. परंतु दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जुनी झाडे मुळासहित उन्मळून पडतात. काही भागात तर अक्षरशः रान मोकळे झाले आहे. त्यातच सगळीकडे हॉटेल्स लोजिंगमध्ये एसी सुरू असल्याने वातावरणात उष्मां जाणवत असल्यामुळे पावसाळ्यात सुध्दा पंखा लावल्याशिवाय गत्यंतरच नसते.
झाडीमुळे काहीशा प्रमाणात हवेत गारवा उपलब्ध आहे परंतु दरवर्षी असंख्य झाडे उन्मळून पडत आहेत. तसेच नवीन बांधकामे करताना अडसर ठरणारी उंच उंच झाडे करवतीच्या साहाय्याने कापली जात आहेत. अधिकारी वर्ग सुध्दा याकडे डोळेझाक करत असून काही राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी माथेरानच्या सौंदर्यात अप्रत्यक्षपणे बाधा आणत असल्याचे बोलले जात आहे. तर बहुतेक हॉटेल्स धारकांनी वनखात्याच्या जागा व्यापून त्याठिकाणी पर्यटकांच्या मुलांसाठी खेळणी लावली आहेत. सनियंत्रण समिती, हेरिटेज कमिटीची परवानगी नसताना जी काही अनधिकृत बांधकामे झाडे कापून केली जात आहेत त्याला आळा घालणे गरजेचे बनले आहे. गर्द वनराईच्या मार्गातून भटकंती करतांना पर्यटकांना एक वेगळीच अनुभुती मिळते त्यामुळेच बहुतेक पर्यटक जंगल भागांतील रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना दिसतात. ह्या स्थळाची प्रतिमा कायमस्वरूपी अबाधित ठेवण्यासाठी शासकीय खात्यांच्या अधिकारी वर्गाने आणि प्रामुख्याने स्थानिकांनी पुढाकार घेऊन इथल्या मातीशी एकरूप असणाऱ्या रोपांची लागवड आणि त्यांचे संवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत इथे वनराई शाबूत आहे तोपर्यंत इथले पर्यटन टिकून राहणार आहे अन्यथा ह्या स्थळाला धोक्याची घंटा असल्याचे सुज्ञ, ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.
पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मोठया प्रमाणावर होत असलेली मातीची धूप थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वयंपुढाकार घेऊन मोठया प्रमाणात वृक्षारोपण संवर्धन करणे गरजेचे आहे.
शैलेंद्र दळवी
माजी अध्यक्ष कोकण वासीय समाज माथेरानमाथेरान हे जग प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून माथ्यावरचे रान अशी ओळख आहे दोनशे ते तीनशे वर्षापासून अनेक जातीची जुनी झालेली झाडे वयोमर्यादेपेक्षाही काही टिकून आहेत तर काही झाडे वादळ पाऊसात पडत आहेत. जंगल वाचवले नाही तर काही वर्षांत माथेरानचे रान नाहीसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रकाश सुतार,
माजी नगरसेवक