। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने जयकुमार सर्कल ते ओवे गावालगतच्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.
जयकुमार सर्कल ते ओवे गावालगतच्या रस्त्यावर सर्वत्र गवताचे साम्राज्य पसरले होते. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी वृक्षारोपण करण्याबाबत पालिकेकडे मागणी केली होती. त्यानूसार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सुमारे 70 बहाव्याच्या झाडांचे रोपण करण्यात आले. बहाव्याच्या झाडांमुळे भविष्यात या परिसराचे सुशोभिकरणही होणार आहे. तसेच येत्या काही दिवसात उर्वरीत रस्त्याच्या कडेला सुमारे 200 झाडे महापालिकेच्यावतीने लावण्यात येणार आहेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार पनवेल महानगरपालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे.
महानगरपालिकेच्या विविध उद्यान केंद्रांवरून नागरिकांना मोफत देशी वृक्षांचे रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केली आहे. यावेळी खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, उद्यान विभागाचे पर्यवेक्षक नितीन राठोड, स्वच्छता निरीक्षक कुणाल गायकवाड, संदिप भोईर, अतुल मोहकर, महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.







