| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करणार्या कर्जत एज्युकेशन सोसायटिला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात वृक्षारोपण करून झाली. संस्थेचे कर्जत शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा असून जवळच कडाव येथे देखील इंग्रजी तसेच सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा चालविली जात आहे.
1974 मध्ये कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कर्जत शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. इंग्लिश मिडीयम स्कुलने कर्जत शहरातील दोन पिढ्या उभ्या करण्याचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात केले आहे. या संस्थेचे कडाव येथे देखील विद्यालय असून कर्जत एज्युकेशन सोसायटीला 50 वर्षे पूर्ण होत असून संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षे साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी प्लांटेशन ड्राइव्ह यांच्या माध्यमातून सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात कर्जत येथे वृक्षारोपण करून झाली आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रवीण गांगल, खजिनदार मदन परमार, तसेच कार्यकारिणी सदस्य सतीश पिंपरे, श्रीकांत मनोरे, संतोषी परमार, भावना परमार यांच्यासह मुख्याध्यापिका साळोखे आणि विद्यार्थी प्लांटेशन ड्राइव्ह चे बाळासाहेब कलगुडे, आदी उपस्थित होते.