केअर ऑफ नेचरचे निगर्ससंवर्धनासाठी मोलाचे योगदान
। पनवेल । वार्ताहर ।
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त उरण तालुक्यातील रॉक अॅनिमल पार्क आणि वेश्वी डोंगरमाथ्यावर दहा ते बारा फुटी उंच अशा वटवृक्षांच्या झाडांची लागवड करण्यात आली. केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. आजवर अनेक ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संतुलनासाठी आणि वसुंधरेला हिरवा शालू पांघरण्यासाठी अनेक वृक्षांची लागवड करुन निसर्ग संवर्धनासाठी आपले योगदान दिले आहे. असे मत यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू मुंबईकर यांनी व्यक्त केले.

मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणातून झालेला पर्यावरणाचा र्हास आणि त्यामुळे अचानक वातावरणात होणारे बदल, कधी अवकाळी पडणारा पाऊस तर कधी ढगफुटीमुळे उद्भवणारी महाभयंकर पूरस्थिती, चक्रीवादळं, अतिउष्णतेमुळे होणारे ग्लोबल वॉर्मिंग त्यातून सार्या जगाला भोगावे लागणारे महाभयंकर दूरगामी परिणाम यातून मानवाने काहीतरी बोध घेऊन निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धनाशिवाय पर्याय नाही, असे मुंबईकर यांनी सांगितले. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून वड, पिंपळ, कडूलिंब, करंज जातीच्या अनेक झाडांची लागवड करून त्या झाडांची देखभाल आणि जोपासना करून तिथल निसर्ग सौंदर्य खुलवलं गेले आहे, असेही ते म्हणाले.

वसुंधरेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची हीच खरी वेळ आणि अंतिम संधी आहे. त्यामुळे सर्वांनी वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करुन आपल्या भावी पिढीसाठी किमान एक व्यक्ती एक झाड लावून या वसुंधरेला हरित करण्याचा संकल्प करावा. – राजू मुंबईकर, अध्यक्ष, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था







