साईडपट्ट्यांवर लावलेली झाडे बेकायदेशीर

उपअभियंता नरेश पवार यांचा खुलासा; वनविभागाकडून उरण-पनवेल मार्गावर वृक्षलागवड
। उरण । वार्ताहर ।
वनीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उरण-पनवेल या रस्त्याच्या साईडपट्ट्यावर विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. परंतु, रस्त्याच्या साईडपट्ट्यांवरील लागवड करण्यात आलेली झाडे ही बेकायदेशीर आहेत, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार यांनी केला आहे.

उरण तालुक्यातील प्रवासी नागरिकांच्या महत्त्वाच्या रहदारीच्या उरण-पनवेल या रस्त्याच्या साईडपट्ट्यावर जुलै महिन्यात विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीही पावसाळ्यात याच रस्त्यावर विविध प्रकारच्या झाडांची लागवड ही हजारो रुपये खर्च करून करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरण करताना सदरची झाडे तोडण्यात आली होती. असे असताना पुन्हा एकदा त्याच रस्त्याच्या साईडपट्ट्यावर नव्याने झाडांची लागवड करण्यात आली आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती देताना सांगितले की, उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्यावर वन विभागाने विविध जातींच्या झाडांची लागवड करण्याचे काम हाती घेतले. परंतु झाडांची लागवड करण्याअगोदर कार्यालयाकडे विचारणा करण्यात आली नाही किंवा परवानगी घेण्यात आली नाही.

जर झाडांची लागवड करण्यासंदर्भात विचारणा केली असती तर रस्त्यावरील साईडपट्टीच्या दूर खाली झाडे लावण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या असत्या जेणेकरून साईडपट्ट्यांची दुरुस्तीचे काम करताना झाडे उद्ध्वस्त होणार नाहीत. त्यामुळे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या साईडपट्ट्यावर लागवड करण्यात आलेली झाडे ही बेकायदेशीर आहेत. त्यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

नरेश पवार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण
Exit mobile version