पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला संताप
| चणेरा | प्रतिनिधी |
धाटाव औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायु प्रदूषणामुळे परिसरातील झाडे झपाट्याने कोमेजत चालली आहेत. पाने काळी पडत आहेत. काही झाडांची पाने पिवळी होऊन गळत आहेत. तर, काही झाडे पूर्णपणे वाळण्याच्या मार्गावर आहेत. या पर्यावरणीय संकटामुळे स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
धाटाव औद्योगिक वसाहतीत काही कारखान्यांकडून निघत असलेला मोठ्या प्रमाणावर धुर, धूळकण आणि रासायनिक वायू हवेत मिसळत आहेत. या प्रदूषित हवेमुळे झाडांसह मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेक केमिकल व निरलॉन रस्त्या लगत असणाऱ्या करंज या झाडांवर केमिकलचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या झाडाची पाने काळी-पिवळी पडलेली दिसत आहेत. झाडांची ही अवस्था आहे तर मानवी फुफ्फुसांवर काय परिणाम होत असतील? याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आणि सामाजिक संघटनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु, अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हवा श्वास घेण्यासाठी असते, संकटासाठी नाही. आता आम्ही गप्प बसणार नाही. जे कारखाने राजरोसपणे वायु प्रदुषण करतात, अशा कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने कारवाई केलीच पाहिजे. अन्यथा सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण प्रेमी सागर जोगडे यांनी दिला आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी झाडांची अशी परिस्थिती दिसून येत आहे त्या ठिकाणी पंचनामा करून वरीष्ठांकडे सादर केला जाईल. तसेच, हवेची गुणवत्ता बघीतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे औटी यांनी दिली आहे.






