। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा नगर पंचायतीच्या 17 प्रभागातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी नाम निर्देशन पत्र दाखल करून घेण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक तिरंगी,चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी माहिती देताना सांगितले.उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे प्रक्रियेत विलंब होत असल्याने दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेडगे यांनी सांगितले.
आज शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार,काँग्रेसचे 9 ,शिवसेना 7 भाजप 7,शेकाप आणि अपक्ष 1 यांचा समावेश आहे.
म्हसळा नगर पंचायतीमध्ये शिवसेना,काँग्रेस पक्षाची युती झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे समर्थक व निष्ठावंतांचा सहकार्य घेत स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. भाजप आणि शेकाप म्हसळा नगर पंचायतीमध्ये काही मोजक्याच जागेवर नशीब अजमावत आहे. बहुतांश प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची सरळ लढत काँग्रेस आणि सेना काँग्रेस युतीमध्ये होणार असल्याचे पक्षीय बळावरून निदर्शनास येत आहे.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जाती जमाती महिलां करिता आरक्षित आसुन या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज मंगेश म्हशिलकर यांचा एकमेव अर्ज सादर केला असल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे..प्रभाग क्रमांक 1 ते 4 अर्ज वगळता अन्य सर्व प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना- काँग्रेस युती मध्ये सरळ लढत होणार आहे.