| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता वन खात्याच्या लाल फितीत अडकला आहे. जानेवारी 2024 मध्ये या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते; मात्र, त्या 13 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
माथेरानच्या डोंगर भागात असणाऱ्या 13 आदिवासी वाड्यांना अजूनही रस्ता नाही. शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर आहे. किरवली ते माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील धनगर वाड्यांना जोडणाऱ्या या रस्त्याला निधी मंजूर असूनही वन विभागाच्या परवानग्या मिळत नसल्याने काम बंद आहे. काही दिवस माथेरान डोंगरात जोरदार पाऊस सुरू असल्याने नाल्यामधून वाहणाऱ्या पाण्यामुळे पायवाट रस्ता बंद आहे. जानेवारी 2024 मध्ये राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजन झालेल्या रस्ता अद्याप झाला नाही. परिणामी या आदिवासी वाडयातील जेष्ठ नागरिक, गर्भावती महिला तरुण यांना आजारपणाच्या वेळी झोळीचा खडतर प्रवास करावा लागत आहे. तर, यापूर्वी स्थानिक अनेक लोकांना रस्ता नसल्याने काही आदिवासींना आपले प्राण गमवावे लागले होते. या रस्त्यासाठी वन विभाग जागा देत नसल्याने आदिवासींचा रस्ता पुढे जात नाही. शासनाने या पत्राची नोंद घेतली नसल्याने आदिवासी समाज संतप्त झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी 15 ऑगस्ट रोजी माथेरान नाक्यावरील हुतात्मा चौक येथे आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.







