प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त
। पाली । वार्ताहर ।
वनवासी नही आदिवासी है, इस देश के मूळनिवासी है…चा नारा देत आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्थेच्यावतीने सुधागड तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडोंहून अधिक आदिवासी व ठाकूर समाज बांधवांनी संघटित होऊन एकजुटीने न्याय्य हक्क व विविध मागण्यांसाठी पाली शहरातून भरदुपारी रणरणत्या उन्हातून दि. 18 एप्रिलला पाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष भालू निरगुडे, उपाध्यक्ष सी.के. वाक, सचिव हरेश विर, खजिनदार दत्तात्रेय निरगुडा, कार्याध्यक्ष ललित फसाळे आदींसह शेकडो आदिवासी ठाकूर समाज बांधव सहभागी झाले होते.
यावेळी आदिवासी, ठाकूर समाजाने दि. 8 मार्च रोजी कसईशेत येथील निरपराध आदिवासींवर जीवघेणा हल्ला करणार्या आरोपी पकडून त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कायद्यांतर्गत कडक कारवाई करावी, तसेच दि. 8 मार्च रोजी सुधागड पाली यांच्या अंतर्गत असलेली जांभुळपाडा येथील पोलीस चौकी संशयास्पद बंद असल्याचे कारण व कर्तव्यावर असणार्या कर्मचारी, अधिकारी यांची वरिष्ठ पातळीवर विभागीय चौकशी करून कर्तव्यात कसूर करणार्यांना निलंबित करणे, पोलीस ठाण्यात आलेल्या आदिवासींना दुय्यम स्थानाची व अपमानजनक वागणूक मिळत असल्याबाबत आणि गेली अनेक वर्षांपासून सुधागड तालुक्यातील गुरेढोरे (जनावरे) राजरोसपणे चोरीला जातात त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी करूनसुद्धा पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही. या आणि अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे पाली पोलीस निरीक्षक यांच्याकडे मांडल्या.
पाली पोलिसांनी त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार केलेल्या मागण्यांचे समाधानकारक उत्तर दिल्याने आदिवासी व ठाकूर समाजाने तो मोर्चा तूर्तास थांबवला आहे. तसेच केलेल्या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर झाली नाही तर सर्व तालुक्यांसह जिल्ह्यातील आदिवासी, ठाकूर समाज बांधव बायका-मुलांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.