आदिवासी बांधव बेघर

| रसायनी | वार्ताहर |

चौक आदिवासी वाडी येथील किसन विठ्ठल कातकरी यांचे घर पावसाच्या थैमानात पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून, ते बेघर झाले आहेत.

गेले काही दिवस पुन्हा पावसाने जोरदार संततधार लावली असून, चौक येथील आदिवासी वाडीतील किसन विठ्ठल कातकरी यांचे घर मध्यरात्री जमीनदोस्त झाले आहे. हे घर कुडामेडीचे, कौलारू होते. झोपेतच मध्यरात्री घर जमीनदोस्त झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. चौक ग्रामपंचायतीच्या सदस्या नैना झिंगे व अ‍ॅड. रिना सोनटक्के यांच्यासह समाजसेवक स्वप्नील सोनटक्के यांनी घटनास्थळी मध्यरात्री भेट देऊन किसन कातकरी यांना धीर देऊन तात्पुरती निवासाची व्यवस्था व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. सदरची घटना तलाठी मधुसूदन पांपटवार यांना समजताच त्यांनी पहाटे भेट देऊन अप्पर तहसीलदार पूनम कदम व निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना अहवाल सादर करून तातडीने शासकीय मदत मिळेल अशी व्यवस्था केली. सरपंच रितू ठोंबरे आणि ग्रामविकास अधिकारी जाधव यांनीही घटनास्थळी भेट देऊन मदत केली.

Exit mobile version