जिल्ह्यातील आदिवासी समाज एकवटला
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांबरोबरच सभा, बैठका व रॅलींमधून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील आदिवासी समाज एकवटला होता. एक वेगळा उत्साह यानिमित्ताने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आला.
आदीवासी समाजाच्या हक्काचे आणि संरक्षण आणि जागरुकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आदिवासी दिन जिल्हा, तालुका व गावपातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त अलिबागमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. पारंपारिक वेशभुषा, नृत्यांचे सादरीकरण करीत असंख्य आदिवासी समाज या निमित्ताने एकवटला.
बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली. अलिबागमधील रायगड बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी नाका, महावीर चौक, एसटी स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शेतकरी भवन ते कुरुळ येथील क्षात्रैक्य सभागृहपर्यंत रॅली काढण्यात आली. आदिवासी गाण्यांच्या ठेक्यावर अनेकजण नाचत होते. या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीसोबत खालू बाजे, ताशे, तसेच पारंपारिक वाद्यांचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी गीतांचेदेखील सादरीकरण करीत आदिवासी समाजाचे महत्व जनतेपर्यंत पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज सहभागी झाला होता. एक वेगळा उत्साह या निमित्ताने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आला. तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.
