| आगरदांडा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी वाडीत वास्तव करणारे एका आदिवासी कुटुंबांतील पाच जणांना मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी वाडीत राहणारा कातकरी समाजाचा सुमीत वाघमारे हा मिठागर येथील एका मुलीच्या सोबत तिच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला असता. त्या गोष्टीचा मनात राग धरुन मिठागर येथील राहणाऱ्या नऊ जणांनी गुरुवारी (दि.28) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जमाव जमवुन भालगाव येथील आदिवासी वाडी येथील रस्तावर येऊन मंगेश वाघमारे यांना हाताबुक्याने व लाथेने मारहाण केली. तसेच त्यांची पत्नी- संगिता वाघमारे, मुलगा – साहिल वाघमारे व काका- चंदर वाघमारे यांच्या डाव्या हातावर मारहाण केली. चुलत भाऊ – राम वाघमारे यांच्या डोक्यावर तसेच त्यांचा मुलगा -सागर वाघमारे यांच्या उजव्या पायाचे पोटरीवर चाकुने वार करुन गंभीर दुखापत करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन जखमींना प्रथम मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तक्रारदार मंगेश वाघमारे (42) रा. भालगाव ता.रोहा यांनी नऊ जणांविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या मध्ये दिपेश ठाकुर, विजय पाटील, परेश ठाकुर, विराज ठाकुर, करण चिपकर, सुजय शहापुरकर, दिपेश माळी, विनिते ठाकुर, सागर ठाकुर यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अलिबाग रायगड उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे घटनास्थळी भेट देऊन संपुर्ण घटनेची माहिती घेतली. आणि सर्व ग्रामस्थांना शांताता राखण्याचे आवाहन यावेळी केले. मारहाण करणारे नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्याचा पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत.







