आदिवासी कुटुंबाला परत मिळाली जमीन

प्रशासनाचा पुढाकार, आदिवासी बांधवांनी मानले आभार

| उरण | वार्ताहर |

धामणी आणि धोधाणी येथील तीन आदिवासी कुटुंबांच्या तब्बल 17 एकर जमिनीवर धनदांडग्यांनी वीस वर्षांपासून अवैधरित्या कब्जा केला होता. प्रशासनाने याप्रकरणी पुढाकार घेत आदिवासी कुटुंबाना सदरची जमीन परत मिळवू दिली आहे. आदिवासी बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. आदिवासी समाज अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेवून त्यांच्याकडून अवैध्यरित्या भाडेकरार, साठेकरार करून आदिवासींच्या जमिनीवर कब्जा केला होता. आदिवासी कुटुंबांनी अर्ज केल्यावर तहसीलदार पनवेल विजय पाटील यांनी संबंधित मंडळ अधिकारी अजित पवार आणि तलाठी श्रीनिवास मेटगी यांना स्थळपाहणी करण्याचे आदेश दिले. स्थळपाहणीमध्ये ही जमीन आदिवासींच्या नावावर असल्याचे दिसून आले. तहसीलदार पाटील यांनी अवैध्यरित्या कब्जा केलेल्या बिगर आदिवासी व्यक्तींना जमिनीचा ताबा सोडण्याचे आणि त्या जमीनी तातडीने आदिवासी कुटुंबाकडे परत करण्याचे आदेश दिले.

धामणी येथील एका कुटुंबाची 10 एकर जमीन, दुसऱ्या कुटुंबाची 5 एकर आणि मौजे धोधणी येथे अन्य आदिवासी कुटुंबाची 2 एकर जमीन आहे. सध्या या जमीनीला बाजारात कोट्यवधी रुपयांचा दर असल्याचे बोलले जाते.

प्रशासनाने ठामपणे आदिवासी बांधवांच्या पाठीशी राहून त्यांना त्यांच्या जमीनी परत मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version